एका व्यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्यापारी म्हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्यापा-याने विचार केला, आपण पहिल्यांदा जाण्यात फायदा आहे, रस्त्याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्या किंमतीवर सामान विकेन. त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या व्यापा-याला वाटले, या व्यापा-याच्या जाण्याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्या खोदलेल्या विहीरीचे पाणी प्यायला मिळेल. शिवाय चांगल्या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्यापा-याच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरी बरोबर घेतल्या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्यांना भेटले, त्या लोकांनी व्यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्याची गरज नाही. व्यापा-याने त्यांचा सल्ला ऐकला. त्या रात्रीच त्या व्यापा-याचा काफिला लुटला गेला. व्यापारीही मारला गेला.एक महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्हा दरोडेखोराच्या माणसांनी त्यालाही खोटे बोलून भुलविण्याचा प्रयत्न केला पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुलला नाही. व्यापा-याच्या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्यापा-याला विचारले असता व्यापारी म्हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्यापारी पुढे गेला व त्याच्या धंद्यात अशा छोट्याशा गोष्टींमुळे तो यशस्वी झाला.
तात्पर्य : अनुभवाने माणूस यशस्वी होतो.