अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.