दुर्योधन अतिशय मानी असल्याने तो पांडवांकडे मैत्रीची भिक्षा मागायला तयार नव्हता. अठराव्या दिवशी शल्य सेनापती झाला. या दिवशी दोन्हीकडील वीरांनी घनघोर युद्ध केले. कृष्णाच्या भाकिताप्रमाणे युधिष्ठिराने शल्याला ठार केले. शल्याचा वध करण्यासाठी युधिष्ठिराने एक प्रदीप्त शक्‍ती त्याच्यावर सोडली होती. भीमाने अकरा कौरव यमसदनी पाठविले. शकुनीचा पुत्र उलूक व शकुनी यांना सहदेवाने पराक्रमाची शर्थ करुन ठार मारले. पांडवांकडील वीर व सव्यसाची अर्जून कौरव सैन्यावर तुटून पडले. भरदुपारी दुर्योधनाने पाहिले की त्याच्या अफाट सैन्याची राखरांगोळी झाली आहे. दुर्योधनाचे मन दुःखाने करपून गेले. विषण्ण मनाने तो रणातून पळाला व पायीच डोहाकडे गेला व संजयाने धृतराष्ट्राला आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला. मी रण भूमीवर दिसताक्षणी मला मारायला सात्यकी आला पण तेवढयात व्यास प्रकट झाले व त्यांनी ’मारु नका’ म्हणून सात्यकीला सांगितले. नंतर मला रस्त्यात दुर्योधन दिसला. त्याने आपल्या पित्यासाठी मला निरोप दिला. कौरवांकडील कृप, अश्वत्थामा व कृतवर्मा हे जिवंत असल्याचे मी दुर्योधनराजाला सांगितले. ते दुर्योधनाचा रणांगणी शोध घेत होते. राजस्त्रिया, सचिव, सेवक सर्व घाबरुन नगराकडे येऊ लागले. युयुत्सूने भयभीत झालेल्या व आक्रोश करणार्‍या वृद्धांना व स्त्रियांना सुरक्षितपणे नगरात आणले. संजय धृतराष्ट्राला हे सर्व सांगत आहे.

युद्धाचा अंतिम दिन

नेमिले शल्या सेनानी

ऐक जे घडले अंतिम दिनी ॥धृ॥

तुटून पडती उभय सैन्य ती

प्राणांची त्या मुळिच ना क्षिती

धर्म-शल्य जणु शरांत बुडती

लोट धुळीचे जाता गगनी - भूवरी, शत्रु दिसेना रणी ॥१॥

शस्त्रप्रहारे झाला पीडित

धर्म होतसे अतीव क्रोधित

घेइ करी शक्‍ती अभिमंत्रित

अनिमिष नेत्रे शल्या पाहुन - टाकिली, वेगे सौदामिनी ॥२॥

छिन्न देह शल्याचा पडला

कौरवराजा स्तंभित झाला

सैन्याचाही नाश पाहिला

उरली ना आशा विजयाची - पाहता, मृत्यूतांडव रणी ॥३॥

सुबलसुताशी सहदेवाचे

संगर झाले अटीतटीचे

शरवृष्टीने तुटली कवचे

कपटद्यूत शकुनीचे आठवुन - घालि तो, घाव रणी गर्जुनी ॥४॥

अश्व, धनू भेदिले शरांनी

स्वर्णपुंख देहात रुतवुनी

शीर छेदिता पडला शकुनी

धैर्यहीन ते वीर भयाने - जाहले, सौबलास पाहुनी ॥५॥

पांडवयोद्धे रणी नाचले

"दुष्टाला तू बरे मारिले"

माद्रिसुता ते वीर बोलले,

"ठार करा पार्थाचे सैनिक" - गर्जला, राजा चवताळुनी ॥६॥

पार्थ वदे निकराची वाचा

"ऐक माधवा निश्चय माझा

समुळ नाश मी करिन शत्रुचा

उदधीसम जे सैन्य तयांचे - राहिले गोठयासम या क्षणी ॥७॥

"ह्यास कशासी ठेवा जीवित"

धृष्टद्युम्न वदे मज पाहत

सात्यकि आला खड्‌ग उगारत

"नका संजया मारु तुम्ही" - बोलले व्यास तिथे प्रकटुनी ॥८॥

असा वाचलो रणांगणातुन

दावानलसम दिसला अर्जुन

मोजित घटका अंतिम ते रण

पुत्र तुझे यमसदनी गेले - सैन्यही, अकरा औक्षहिणी ॥९॥

कुरुस्त्रिया होत्या आक्रोशात

ऊर बडवुनी पुरी प्रवेशत

वीर युयुत्सू त्यांसी रक्षित

पराभवाचे वृत्त जणू हा - नगरिला सांगे शोकध्वनी ॥१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel