पांडवांनी खांडववन जाळले व त्या भूमीवर इंद्रप्रस्थ वसविले.युधिष्ठिर राजा झाला. पराक्रमी पांडवांनी चारी दिशांच्या राजांना जिंकून त्यांना मांडलिक बनविले. जरासंधासारख्या बलाढय राजालाही शिताफीने ठार मारले. त्यानंतर युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. त्या महान सोहळ्याला विविध देशांचे राजे, दुर्योधन, शिशुपाल, ऋषिगण, व्यास वगैरे आले होते. भीष्मांनी राजमंडळात श्रेष्ठ अशा कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. कृष्णाच्या आतेभावाला दुष्ट शिशुपालाला ते रुचले नाही. त्याने भीष्मांची व कृष्णाची खूप निंदा केली. शिशुपालाच्या लहानपणच्या एका प्रसंगातून त्याच्या मातेला कळले होते की कृष्णाच्या हातून त्याला मरण येईल. तिने दयेची भीक मागितली म्हणून कृष्णाने वचन दिले होते की तो शिशुपालाचे शंभर अपराध सहन करील पण त्यानंतर मात्र त्याचा वध करील. या राजसूयात शिशुपालाचा तोल गेला होता. त्याच्या निंदेला भीष्मांनी सडेतोड उत्तर दिले. तरीही शिशुपाल ऐकेना तेव्हा कृष्णाने त्याचा त्या यज्ञातच शिरच्छेद केला.

कृष्णाची अग्रपूजा

व्यर्थ तुझी दुर्वचने रे शिशुपाला ।

कृष्ण हाच योग्य आज अग्रपुजेला ॥धृ॥

शोभतसे मखमंडप श्रेष्ठनृपांनी

सर्वांचे पूजन मी योजिले मनी

मान परी हा जाई श्रेष्ठतमाला ॥१॥

कृष्णाने सर्व नृपा रणी नमविले

दावा मज एक तरी ज्या न जिंकिले

भूषण हा ठरे सर्व राजमण्डला ॥२॥

राजनीतिकुशल तसा हा बलशाली

अतुल अशी कर्मे अन्‌ कीर्ति ऐकली

गुणांमुळे वृद्धाहुन श्रेष्ठ मानिला ॥३॥

क्षत्रियात अधिक शूर शौरि हा असे

ह्याच्याहुन अधिक ज्ञान श्रोत्रिया नसे

अद्वितीय म्हणुन मान केशवा दिला ॥४॥

पूज्य नसे केवळ हा आमुच्या कुला

तिन्हि लोक मिळुन वंद्य असे जगाला

चेदिराज, जाणुन घे जनार्दनाला ॥५॥

बुद्धितेज, शौर्य, शील, धर्मसंपदा

सात्त्विक गुण अप्रतीम प्राप्त अच्युता

अन्य असा महापुरुष दिसे ना मला ॥६॥

हितकर्ता बांधवा हा आप्त म्हणोनी

पूजिले न ह्यास आज अग्रिम स्थानी

अग्रगण्य तेजाने म्हणुन अर्चिला ॥७॥

हाच असे कारण या सृष्टि-लयाचे

हाच करी पालन ह्या पंचभुतांचे

गोविन्दच आश्रय ह्या जगाला ॥८॥

पर्वतात मेरु तसा जगावेगळा

जाण नसे मूढा या चेदिपतीला

गुण त्याचे ज्ञात परी सर्व सभेला ॥९॥

बाल वृद्ध मानति या श्रेष्ठ भूवरी

पूज्यांना पूज्य असे हा खरोखरी

प्रतापात भूप कोण तुल्य तयाला ? ॥१०॥

कोण योग्य नच मानिल जनार्दनाला ?

कोण नाहि पूजणार पूज्यतमाला ?

उचित काय कळते या शांतनवाला ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel