बेल वाजली.
सायलीच्या सासूबाईंनी दार ऊघडलं.
कुकर गॅसवर फुरफुरत होता.
पहिली शिट्टी होवून गेलेली.
सायली धुसफुसतच घरात शिरली.
अगदी कुकरसारखीच.
मागनं चिऊ..
चिऊचा चेहराही पडलेला.
चिऊ घरात शिरली अन् धूम पळत आबांच्या कुशीत.
चिऊ विदाऊट हासू ?
अॅन्ड नाऊ विथ आसू..
आबांना सवयच नव्हती.
आबा गलबलले.
कुशीतल्या चिऊला हळूहळू थोपटू लागले.
इतका वेळ धरून ठेवलेलं आसवांचं धरण फुटलेलं.
चिऊच्या गालांवर पाणलोट क्षेत्र.
आबा मात्र प्रचंड अस्वस्थ.
चिऊच्या डोळ्यातला एकही आसू, आबांना सहन व्हायचा नाही.
मायलेकींचं काहीतरी बिनसलेलं असणार.
फाॅर ए मोमेंट...
आबा सायलीवर मनापासून चिडले.
मनातल्या मनात.
नंतर सावरले.
सायलीची रोजची धावपळ.
दिवसभर आॅफीसात राबते.
घरी आल्या आल्या लगेच चिऊला क्लासला सोडायला जाते.
अगदी चहाही न घेता.
तासभर तिथेच.
घरी यायला साडेसात.
तोवर चिऊच्या आजीचा स्वयपाक रेडी.
सायली , आबा , आजी...
अफलातून टीमवर्क.
चिऊला स्कूलबसला सोडणं , आणणं, होमवर्क...
सगळं सगळं आबा सांभाळायचे.
सकाळी स्वयपाक करून सायली आॅफीसला पळायची.
संध्याकाळचा स्वयपाक चिऊची आजी.
चिऊचा बाबा तिकडं दूरदेशी.
ओमानला.
इथे रोजची लढाई.
एक एक दिवस रक्त आटवणारा.
आॅफीस ,  चिऊचा क्लास.. सायली थकून जाते.
शाळा , क्लास... चिऊही थकते.
आणि चिऊचे आबा आजीही.
म्हणून तर आख्खं घर रविवारची वाट बघायचं.
एरवी दोघीही हसमुखराय असायच्या.
एखाद दिवशी बिनसतं.
वरच्या पट्टीतली रागदारी ऐकू येते.
अशा वेळी इतरांनी कानसेन व्हावं.
निमूटपणे तो रागविस्तार ऐकून घ्यावा.
एकदा निचरा झाला की नेहमीचा सूर लागतोच.
थोडा वेळ धीर धरायचा..
आबांनी समजून घेतलं.
शांतम् शांतम्....
वातावरण तंगच होतं..
सायलीनं पटाटा पानं घेतली.
पान घेताना जराशी आदळाआपट.
चिऊ मान खाली घालून जेवत होती.
चॅनल म्यूट.
नो चटरपटर.
सायलीची नजर पेटलेली..
एकदम फूल बने अंगारे.
न बोलता जेवणं आटोपली.
अगदी दहा मिनटांत.
आबांनाच टेन्शन आलेलं.
कोकराची काळजी वाटू लागली.
सगळे हाॅलमधे जमले.
झाला..
ज्वालामुखीचा स्फोट झाला एकदाचा.
" आबा , आजी,... करा.
करा कौतुक अजून नातीचं.
खोट बोललीये चिऊ आज.
दोन दिवस क्लासला सुट्टी आहे म्हणाली.
मीही विश्वास ठेवला.
मी आपलं खालनंच सोडते आणि आणते.
जिना चढून वर जात नाही.
कधीतरीच मॅम भेटतात तिच्या.
आज नेमक्या भेटल्या.
" रिया वाॅज अॅबसेंट फाॅर लास्ट टू डेज "
काय बोलणार ?
आपलेच दात घशात घातले पोरीने.
मीच वेडी.
हिच्या रँकसाठी मर मरायचं.
आणि तिला काडीची किंमत नाही.
नुसता संताप संताप होतोय.
एक दिवस वेडी होईन मी "
सायली भयानकच बिथरलेली.
चिऊ..
चिऊकडे तर बघवत नव्हतं.
आबांच्या कुशीत आडोसा शोधणारं कोकरू.
चिऊच्या डोळ्यातून संततधार.
आबा आजी सुन्न.
खरंच...
चिऊ नाहीये हो अशी.
अभ्यास मनापासून आवडतो तिला.
रँक असतो तिचा दरवेळी.
खोटं नाही बोलणार ती.
काही तरी वेगळा प्राॅब्लेम असणार.
" तू शांत हो बघू आधी.
आत जाऊन पड जरा.
आम्ही बोलतो चिऊशी.
आपलीच पोर आहे.
जास्त चिडलीस तर कायमची भिती बसेल, पोरीच्या मनात."
चिऊच्या आजीनं सायलीची, आतल्या खोलीत पाठवणी केली.
इकडे...
काही झालंच नाहीये अशा थाटात ,आबांनी गोष्ट सुरू केली.
रोजची गोष्ट.
बटाटेमहाराजांची.
पहिल्यांदा मुसूमुसू गोष्ट ऐकणारी चिऊ.
हळूच गोष्टीत हरवली.
शेवटी तर खुदकन् हसली.
आबा की मेहनत रंग लाई.
चिऊला एकदम काही तरी आठवलं.
" आबू खरं सांगू , वेनस्डेलाच आईला बरं वाटत नव्हतं.
थर्सडेला शाळेत जाताना तर ती जास्त टायर्ड वाटली.
म्हणूनच मी ठरवलं.
दोन दिवस क्लासला हाॅलीडे डिक्लेअर करायचा.
तेवढीच आईला रेस्ट घेता येईल.
म्हणून मी क्लासला बुट्टी मारली.
चिनूच्या बुकमधलं मी सगळं काॅपी केलंय आबू..
क्लासचा होमवर्कही केलाय.
तरीसुद्धा मी खोटं बोलले.
साॅरी..
ममा मला माफ करेल ना."
चिऊचा दर्दभरा सवाल.
" का नाही करणार ?
नक्की करेल.
आबू है ना.
तू झोप बरं आता."
चिऊ आबांची मांडी आसवांनी भिजवून झोपी गेली.
आली रे आली.
आता आबांची बारी.
आबांना चिऊचं कौतुकच वाटलं.
चिऊ झोपल्यावर आबा , आजी अन् सायली..
तीन बोर्ड आॅफ डिरेक्टर्सची मिटींग.
रात्री अकरापर्यंत चालली.
ठरलं.
दुसर्या दिवशी सकाळी.
गुडमाॅर्नींग चिऊल्या.
आईचा मूड परत आलेला.
आबा ,आजीही खूष दिसत होते.
'काहीही असो खोटं बोलायचं नाही'
सेड बाय चिऊज ममा.
' येस ममा, प्राॅमीस."
चिऊने कहा.
मांडवली.
क्रायसीस संपला.
तेवढ्यात ममाने गुड न्यूज दिली.
" चिऊ आजपासून नो ट्यूशन.
तू स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा.
काही प्राॅब्लेम आला तर आबा सांगतीलच.
आबा तुला टाईमटेबलही बनवून देणार आहेत.
नको ती धावपळ आणि दमवणूक.
नाही आली रँक तरी चालेल,
रोजचा दिवस आनंदात संपायला हवा."
'थँक्यू ममा.
आबा है तो फिकर नाॅट.
मी मनापासून अभ्यास करेन.
डोंड फरगेट, आबा ईज ईन्जीनियर फ्राॅम सीओईपी.
मजा भी आयेगा और रँक भी.'
चिऊ आनंदाच्या ढगात ऊडत शाळेत गेली.
आबा आजी खूष.
मोठ्या मुश्कीलीनं सायली 'राजी' झालेली.
दमवणारा प्रश्न निकाली निघालेला.
एकदम आबांना चिऊच्या अभ्यासाचं टेन्शन आलं.
चिऊचा हसरा चेहरा आठवला.
" डोन्ट वरी, हो जायेगा"
आबांचा काॅन्फीडन्स ओव्हरफ्लो झाला.
अन् आबा...
फ्रेश संध्याकाळची वाट पाहू लागले.
बटाटेमहाराज की जय !

...... कौस्तुभ केळकर नगरवाला

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel