श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
आजि अविद्यातिमिर गेलें हरपोनी ॥ भक्तविजय उगवला वासरमणी ॥ देवैतभेदाचीं नक्षत्रें गगनीं ॥ गेलीं लोपोनि निजतेजें ॥१॥
तेणें ज्ञानप्रकाशें साचार ॥ नवविध मार्ग जाहले गोचर ॥ मग साधकजनीं करून विचार ॥ श्रवणपंथें चालिजे ॥२॥
एक कीर्तनमार्गें निश्चितीं ॥ लागले प्रेमळाचे संगतीं ॥ तेणें जड मूढ तारून प्रीतीं ॥ केला श्रीपती स्वाधीन ॥३॥
एक मननाचिया वाटा ॥ लक्षूनि चालिले चोंहटा ॥ एक स्मरणाच्या दरकुटा ॥ एकाग्रचित्तें बैसले ॥४॥
कोणासी आवडे पदसेवन ॥ त्यांहीं त्याच पंथें केलें नमन ॥ एक अर्चन नगर देखून ॥ चालिले सत्वर त्या ठाया ॥५॥
कोणी वंदनमार्गी धरूनि प्रीती ॥ तिकडेच चालिले सत्वरगती ॥ एक आत्मनिवेदनाचे पंथीं ॥ लागले निश्चितीं निजप्रेमें ॥६॥
ऐसे नवविध मार्ग प्रांजळ ॥ साधकीं केले अति चोखाळ ॥ आणिकही भक्त प्रेमळ ॥ लागले तत्काळ त्याच पंथीं ॥७॥
मागिले अध्यायीं कथा अद्भुत ॥ गोरियासी फुटले हस्त ॥ मृत बाळक रुक्मिणीकांत ॥ आणोनि दिधले तयासी ॥८॥
मग गोरा जोडोनि हात ॥ सकळ संतांसी विनवित ॥ माझा आश्रम करावया पुनीत ॥ चलावें त्वरित मंदिरा ॥९॥
बहुत आर्त देखोन ॥ अवश्य म्हणती संतजन ॥ तेच पायीं सत्वर गमन ॥ करिते जाहले तेधवां ॥१०॥
गोरियाचें सदनाप्रती ॥ वैष्णव आले सत्वरगती ॥ परम हर्ष वाटला चित्तीं ॥ नमन प्रीतीं करितसे ॥११॥
बैसावया तृणासन ॥ देऊनि केलें चरणक्षालन ॥ तें तीर्थ करितां प्राशन ॥ संतोष मनीं वाटला ॥१२॥
षोडशोपचारें पूजन करून ॥ षड्रसीं घातलें भोजन ॥ मुखशुद्धीस तुलसीपान ॥ दिधलें आणून सकळांसी ॥१३॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान ॥ नामा सांवता वैष्णवजन ॥ मुक्ताबाई गुणनिधान ॥ बैसलीं संपूर्ण स्वस्थानीं ॥१४॥
ज्ञानदेव म्हणे गोरियाकारण ॥ तुवां घट बैसविले घालूनि आसन ॥ त्यांत हिरवें भाजलें निवडोन ॥ आम्हांकारणें सांगिजे ॥१५॥
ऐसें बोलतां ज्ञानेश्वर ॥ तर्केंचि जाणितला विचार ॥ मग गोरियानें थापटी सत्वर ॥ हातीं घेतली तेधवां ॥१६॥
सकळ संतांचें मस्तकावरी ॥ थापटी हाणी ते अवसरीं ॥ मौन धरूनि निजअंतरीं ॥ उगेच बैसले सकळिक ॥१७॥
नामयापासीं येतां जाण ॥ म्हणे उगेंच कां करिसी मज ताडण ॥ गोरा म्हणे हें भाजन ॥ हिरवेंचि आहे अद्यापि ॥१८॥
तंव मुक्ताबाई म्हणे त्यासी ॥ गोर्‍या कैसें कळलें तुजसी ॥ भला परीक्षक सुजाण होसी ॥ जाणवलें मज निश्चित ॥१९॥
हिरे रत्नमुक्ताफळांसी ॥ जोहरी परीक्षिती त्यांसी ॥ तैसे कुंभार भाजनांसी ॥ निजदृष्टीसीं ओळखती ॥२०॥
कीं रोगियास व्याधि असतां सहज ॥ ओळखूं जाणे वैद्यराज ॥ तेवीं हिरवें भाजलें कळलें तुज ॥ दृष्टीं देखतां क्षणमात्रें ॥२१॥
ऐसी ऐकूनियां मात ॥ गदगदां हांसती सकळ संत ॥ नामा विरोनि गेला मनांत ॥ चिंताक्रांत जाहला ॥२२॥
मग सत्वर उठोनि त्या अवसरा ॥ नामदेव आले पंढरपुरा ॥ मग भेटोनि रुक्मिणीवरा ॥ जीवींचें निजगुज सांगत ॥२३॥
कंठ होऊनि सद्गदित ॥ नेत्रीं वाहती अश्रुपात ॥ म्हणे देवा अपमानें बहुत ॥ जाहला संतप्त जीव माझा ॥२४॥
मग हांसोनि जगज्जीवन ॥ नामयासी दिधलें आलिंगन ॥ म्हणे बोलिलें तुज कवण ॥ सांग संकोच न धरितां ॥२५॥
नामा म्हणे हृषीकेशी ॥ सन्मान सांगावा जनांसी ॥ आणि अपमान सांगावा मनासी ॥ रीती ऐसी असे कीं ॥२६॥
यावरी बोले रुक्मिणीरमण ॥ मी तुझे मनींची जाणतों खूण ॥ तुजविण मज सखा सज्जन ॥ न दिसे आन सर्वथा ॥२७॥
अत्यंत मित्रासी सांगतां गुज ॥ चित्तीं येऊं न द्यावी लाज ॥ ऐसें नामयासी अधोक्षज ॥ बोलिले सहज निजप्रीतीं ॥२८॥
मग म्हणे देवा ऐक मात ॥ गोरा कुंभार तुझा भक्त ॥ तेणें घरा नेऊनि संत ॥ अघटित एक केलें कीं ॥२९॥
बैसवूनि तृणासनीं ॥ पूजा केली प्रीतीकरूनी ॥ मग ज्ञानदेवें खुणावोनी ॥ तयालागीं सांगितलें ॥३०॥
मग थापटी घेऊनी करीं ॥ मारी सर्वांचें मस्तकावरी ॥ परी मौन धरूनि अंतरीं ॥ कोणी उत्तर न देती ॥३१॥
मजपासीं येतां मारावया ॥ भय वाटले देवराया ॥ मग दूर होईं म्हणितलें तया ॥ तुझे पाय आठवूनि ॥३२॥
ऐसी ऐकतांचि मात ॥ हांसूं लागले सकळ संत ॥ ज्ञानदेव मुक्ताबाईसमवेत ॥ करिती कुचेष्टा निजांगें ॥३३॥
गोरा म्हणे मजलागून ॥ हें हिरवेंचि आहे भाजन ॥ ऐकूनि हांसले संतजन ॥ लज्जायमान मी जाहलों ॥३४॥
मग उठोनि वेगेंसीं ॥ सांगावया आलों तुजपासीं ॥ ऐसें सांगतां नामयासी ॥ हृषीकेशी हांसले ॥३५॥
नामयासी म्हणे जगज्जीवन ॥ ते यथार्थ बोलिले तुजलागून ॥ जो सद्गुरूसी न जाय शरण ॥ अपक्व म्हणती तयासी ॥३६॥
ऐसें बोलतां चक्रपाणी ॥ नामा विरला अंतःकरणीं ॥ जेवीं लवणावरी घालितां पाणी ॥ जाय विरूनि क्षणमात्रें ॥३७॥
कीं साखरेवरी घालितां जळ ॥ विरूनि जाय तत्काळ ॥ तेवीं वचन बोलतां घननीळ ॥ भक्त प्रेमळ चिंतावला ॥३८॥
मग पुढती दोवसी बोले उत्तर ॥ तूं करिसील दुःखाच परिहार ॥ म्हणोनि गार्‍हाणें सत्वर ॥ सांगावयासी तुज आलों ॥४०॥
तुवां अवकृपा धरूनि पाटीं ॥ त्यां सारिखीच मज सांगसी गोष्टी ॥ आतां आम्हां ठाव जगजेठीं ॥ न दिसे कोठें बैसावया ॥४१॥
धरणी उबगली वृक्षासी ॥ तरी ठावचि नाहीं जावयासी ॥ कीं मायेनें टाकितां बाळकासी ॥ कोण तयासी सांभाळी ॥४२॥
कांसवी न पाहे पिलियांप्रतीं ॥ तरी तीं वांचतील कैशा रीतीं ॥ राजा न करी न्यायनीती ॥ तरी प्रजा पावती सुख सांभाळी ॥४३॥
तेवीं तुम्हींच आजि चक्रपाणी ॥ उदास केलें मजलागूनी ॥ आतां दुजें त्रिभुवनीं ॥ कोणी न दिसे तुजपरतें ॥४४॥
नामयासी बोले पंढरीनाथ ॥ तुझें माझें एक चित्त ॥ जेवीं पुष्पामाजी मकरंद वसत ॥ नाहीं द्वैत दोघांसी ॥४५॥
तेवीं तूं माझा जीवप्राण ॥ नको उदास बोलूं वचन ॥ आतां सद्गुरूसी शरण जाऊन ॥ द्वैतखंडन करावें ॥४६॥
नामा म्हणे देवाधिदेवा ॥ सद्गुरु मज कासया हवा ॥ तूं सन्निध असतां केशवा ॥ मग कैंचे जीवास बंधन ॥४७॥
व्रतें तपें यज्ञ दानें ॥ तुजलागूनि करावीं अनुष्ठानें ॥ तुझी प्राप्ति व्हावयाकारणें ॥ जावें शरण सद्गुरुसी ॥४८॥
अकस्मात मिळालिया शर्करा ॥ मग कासया जावें बाजारा ॥ कीं मुखीं पडतां पीयूषधारा ॥ मग चरावया डोंगरा कां जावें ॥४९॥
कीं आइतेंच पक्वान्न आलें देख ॥ मग कासया करावा स्वयंपाक ॥ घरीं द्रव्य जोडल्या अनेक ॥ कासया प्रवास करावा ॥५०॥
तेवीं तूं संनिध असतां जगद्गुरु ॥ मग कासया करावा स्वयंपाक ॥ नामयाचा विचारु ॥ शारंगधरु काय बोले ॥५१॥
अरे नामया ऐक वचन ॥ मी रामावतारीं जाण ॥ वसिष्ठासी जाऊन शरण ॥ आध्यात्मज्ञान पुसिलें ॥५२॥
कृष्णावतारीं सांदीपनीसी ॥ शरण गेलों सद्भावेंसी ॥ शरण गेलों सद्भावेंसीं ॥ तेव्हांच आत्मज्ञान मजसी ॥ प्राप्त जाहलें निश्चित ॥५३॥
यालागीं माझें ऐकसील वचन ॥ तरी सकळ संतांसी होसील मान्य ॥ ऐसें बोलतां जगज्जीवन ॥ धरिले चरण नामयानें ॥५४॥
म्हणे देवा सांग मजसी ॥ सह्रण जाऊं कोणत्या गुरूसी ॥ ऐसें ऐकोनि हृषीकेशी ॥ काय बोलिले तेधवां ॥५५॥
विसोबा खेचर शिवालयांत ॥ जाहला असे निद्रिस्त ॥ त्याजसारखा ज्ञानी विरक्त ॥ न दिसे जाण त्रिभुवनीं ॥५६॥
तरी सत्वर जाऊनि तया ठाया ॥ शरण जाईं त्या सद्गुरुराया ॥ मग नमस्कारूनियां पायां ॥ अश्रु नयनीं लोटले ॥५७॥
नामा म्हणे देवा तुजविण ॥ मज कंठेना एक क्षण ॥ यासी म्हणसील काय प्रमाण ॥ तरी तुझीच आणि वाहतसें ॥५८॥
मग म्हणे शारंगधरु ॥ नामया रक्षीं लोकाचारु ॥ तुवां जरी न केला सद्गुरु ॥ तरी अज्ञान नर केवीं तरती ॥५९॥
ऐसें बोलतां चक्रपाणी ॥ नामा उठिला तये क्षणीं ॥ परम कष्ट वाटले मनीं ॥ कैशा रीतीं तें ऐका ॥६०॥
जेवीं श्रीकृष्ण उद्धवाकारण ॥ एकादशस्कंधीं सांगोनि ज्ञान ॥ बदरिकाश्रमीं त्याजकारण ॥ पाठवितां कष्ट पावले ॥६१॥
त्याचाचि अवतार साक्षात ॥ कलियुगीं झाला नामा भक्त ॥ म्हणोनि योजूनि दृष्टांत ॥ त्याचा त्यासीच दिधला ॥६२॥
व्रतांमाजी एकादशी ॥ कीं दैवतांमाजी हृषीकेशी ॥ तीर्थांत चंद्रभागेऐसी ॥ उपमा द्यावयासी दिसेना ॥६३॥
जे उदंड करिती तीर्थाटन ॥ परी अधिकचि वाढे अभिमान ॥ आणि चंद्रभागा पाहतां दुरून ॥ निरभिमानी होय प्राणी ॥६४॥
हें मी काय वर्णूं थोरी ॥ जाणती पंढरीचे वारकरी ॥ यास्तव भीमरथीची थोरी ॥ आणिका तीर्था नयेचि ॥६५॥
चंद्रभागेऐसें तीर्थ ॥ आणि पंढरीऐसें क्षेत्र ॥ नाम्याऐसा भक्त पवित्र ॥ नाहीं दिसत त्रिभुवनीं ॥६६॥
तो जातां सद्गुरूचे भेटी ॥ देवाचा वियोग न साहे पोटीं ॥ मग ध्यानांत आणोनि जगजेठी ॥ उठाउठीं चालिला ॥६७॥
मल्लिकार्जुनाचें देउळांत ॥ नामा येऊन पाहे त्वरित ॥ तों विसोबा खेचर निद्रित ॥ जाहले असती ते ठायीं ॥६८॥
पायताण चढवोनि तेच क्षणीं ॥ शाळुंकेवरी ठेविले चरण दोनी ॥ तें नामदेवें देखोनि नयनीं ॥ विस्मित अंतरीं जाहला ॥६९॥
म्हणे हाचि सद्गुरु मजकारणें ॥ धुंडोनि काढिला रुक्मिणीरमणें ॥ शिवमस्तकीं चरण ठेविले जेणें ॥ उन्मत्त होऊनि निजेला ॥७०॥
घेऊं जातां सद्गुरुदर्शन ॥ तो प्रथम देखिला अवगुण ॥ जेवीं पहिला ग्रास घेतां जाण ॥ तों मक्षिका देखिली अन्नांत ॥७१॥
कीं देशावरासी जातां सत्वर ॥ तों पुढें देखे रिती घागर ॥ कीं पुस्तकारंभीं साचार ॥ प्रथमाक्षर चुकलें पैं ॥७२॥
घेऊं जातां सूर्यदर्शन ॥ तों तयासी लागलें ग्रहण ॥ कीं वधूवरांचें घटित पाहतां जाण ॥ तों एक नाडी दिसोनि आली ॥७३॥
कीं द्वितीयेचा चंद्र पाहातां नयनीं ॥ तों अभ्र कोंदलें गगनीं ॥ तेवीं सद्गुरु देखतां दुरूनी ॥ अवगुण दृष्टीं देखिला ॥७४॥
मग सन्निध येऊनि विष्णुभक्त ॥ विसोबासी काय वचन बोलत ॥ तुम्ही म्हणवितां साधुसंत ॥ काय विपरीत हें केलें ॥७५॥
साक्षात शिव पार्वतीरमण ॥ त्यावरी कैसे ठेविले चरण ॥ ऐसें तुमचें ब्रह्मज्ञान ॥ कळों  आलें आम्हांसी ॥७६॥
विसोबा बोले नामया पाहीं ॥ चुकी घडली ये समयीं ॥ सदाशिव नसे जया ठायीं ॥ तेथेंचि ठेवीं पद आतां ॥७७॥
माझें शरीर जर्जर देखा ॥ उठावयासी नाहीं आवांका ॥ तूं विष्णुदास भेटलासी सखा ॥ सांगसी निका विचार ॥७८॥
तरी जेथें नसेल पार्वतीरमण ॥ तेथेंचि उचलोनि ठेवीं चरण ॥ नामदेवें ऐकोनि वचन ॥ निकट सन्निध पातला ॥७९॥
मग निजकरें धरूनि पाय ॥ उचलित जाहला नामदेव ॥ तों अवधा लिंगाकार ठाव ॥ दिसों लागला तेधवां ॥८०॥
जिकडे जिकडे चरण फिरवीत ॥ तिकडे तिकडे लिंगेंचि दिसत ॥ तिळमात्र स्थळ न दिसे रित ॥ चित्तीं विस्मित जाहला ॥८१॥
घंटा मृदंग साचार ॥ अवघा शिवमय आकार ॥ दर्शना आले नारीनर ॥ ते पार्वतीवर दिसताती ॥८२॥
विलोकितां सद्गुरुचरण ॥ तेही शिवमय दिसती जाण ॥ आपणासी पाहे विचारून तों शिवमय निजांगें ॥८३॥
भोंवतें विलोकी निजप्रीतीं ॥ तों देवळासमवेत कैलासपती ॥ नामा विस्मित होऊनि चित्तीं ॥ चरण मस्तकीं वंदिलें ॥८४॥
मग सद्गुरु म्हणती ते अवसरीं ॥ मजला कष्ठ होती भारी ॥ आतां चरण धरेवरी ॥ ठेवीं लवकरी विष्णुभक्तां ॥८५॥
ऐकोनि नामा बोले वचन ॥ तुम्ही ज्ञानसागर चैतन्यवन ॥ स्वामींचें करितां पादसेवन ॥ शिवमय संपूर्ण भासतें ॥८६॥
जिकडे तिकडे कैलासनाथ ॥ अणुमात्र स्थळ न दिसे रित ॥ चित्तीं होऊनि विस्मित ॥ चरण मस्तकीं वंदिले ॥८७॥
विसोबा म्हणे नामयाकारण ॥ ऐका शिवाचें निजध्यान ॥ मग नंदभाषेंचि बोलून ॥ संशयखंडन करीतसे ॥८८॥
मुळू वदनें जयाकारण ॥ उदानु नेत्र दैदीप्यमान ॥ अंगुळु हस्त शोभती जाण ॥ त्याचें ध्यान सांगतों तुज ॥८९॥
मस्तक जयाचा पाहतां दृष्टीं ॥ असे कैवल्याआगळी काठी ॥ आणि पवित्रूंचे तळवटीं ॥ चरण असती तयाचे ॥९०॥
वर्णितां त्याचें महिमान ॥ सेलु लज्जित जाहलें मन ॥ पोकु बोलतां अर्थज्ञान ॥ वेडावले मानसीं ॥९१॥
अठरा वर्णितां नव्हे लेख ॥ तंव ढकारवदनाचा आला देख ॥ तेणें गुण वर्णितां सुरेख ॥ जिव्हा दुखंड जाहल्या ॥९२॥
ऐसा न लागे त्याचा पार ॥ मग अवारू जोडूनियां कर ॥ म्हणे मी ज्ञानेश्वराचा किंकर ॥ याचे चरणीं विनटलों ॥९३॥
ऐसें सद्गुरुवचन ऐकतां ॥ ठसावलें नामयाचे चित्ता ॥ जेवीं अर्जुनासी विश्वरूप दावितां ॥ अनुभव चित्तीं ठसावला ॥९४॥
मग नामा म्हणे सद्गुरुमाय ॥ आम्हां तारक तुझेचि पाय ॥ तुझें चरणवंदनें सोय ॥ अवघें एकमय मज दिसे ॥९५॥
मग विसोबा उठोनि सत्वर ॥ ठेविला मस्तकीं अभयकर ॥ तेव्हां नामयानें रुक्मिणीवर ॥ हृदयकमळीं ओळखिला ॥९६॥
तंव एके दिवसीं सकळ संत ॥ गरुडापरीं मिळाले तयांत ॥ नामयासी पंढरीनाथ ॥ आलिंगन देतसे ॥९७॥
म्हणे त्वां सद्गुरु केल्यावर ॥ आमचा न घेसी समाचार ॥ कैसें मन करूनि निष्ठुर ॥ राहिलास निरंतर त्यापासीं ॥९८॥
यावरी नामा उत्तर देत ॥ तुझें स्वरूप सद्गुरुनाथ ॥ आतां माझिया चित्तांत ॥ द्वैत नसेचि सर्वथा ॥९९॥
ऐकून नामयाचें वचन ॥ संतोषला रुक्मिणीरमण ॥ सकळ संतांसी जगज्जीवन ॥ काय बोलत तेधवां ॥१००॥
आतां तुमचे नामयाकारण ॥ झणीं म्हणूं नका हिरवें भाजन ॥ ऐसें बोलतां जगज्जीवन ॥ कळली खूण ज्ञानदेवा ॥१॥
आणिक रसाळ कथावाणी ॥ श्रोते हो सादर ऐका कानीं ॥ परिसा भागवतें अनुष्ठान करूनी ॥ माता रुक्मिणी आराधिली ॥२॥
प्रसन्न होऊनि आदिमाया ॥ त्यावरी केली पूर्ण दया ॥ कृपादृष्टीं पाहूनियां ॥ केली छाया कृपेची ॥३॥
सगुणस्वरूपें देऊनि भेटी ॥ परिसा भागवत धरिला पोटीं ॥ म्हणे बाळका इच्छा गोमटी ॥ धरिली काय ते मज सांगें ॥४॥
येरू अंतरीं करूनि विचार ॥ मातेसी बोले प्रत्युत्तर ॥ तुझें भजनीं चित्त स्थिर ॥ निरंतर असावें ॥५॥
आणि उद्वेगाची मात ॥ कदा न यावी निजमनांत ॥ ऐसा माझा असे हेत ॥ पुरवीं मनोरथ जननीये ॥६॥
मग एक परिस आणून झडकरी ॥ दिधला तयाचिये करीं ॥ म्हणे यासी जीवावेगळा दूरी ॥ कदा न करीं भागवता ॥७॥
लोह लाविसील यास जितुकें ॥ तुझें घरीं सुवर्ण होय तितुकें ॥ मातेचें वचन ऐकूनि निकें ॥ संतोष वाटला मनांत ॥८॥
जैसे शतक्रतु सायासें करितां ॥ मग अमरपदचि आलें हातां ॥ कीं दशग्रीवें अनुष्ठान करितां ॥ लाधली अवचितां ॥ हेमनगरी ॥९॥
तेवीं समाधान पावूनि चित्ता ॥ नमस्कारिली आदिमाता ॥ मग कमळजा त्याची कांता ॥ परिस दिधला तिजपासीं ॥११०॥
लोह आणूनि ते अवसरीं ॥ तया लावोन पाहती सत्वरीं ॥ तों जांबूनद सुवर्ण झडकरी ॥ जाहलें असे तेधवां ॥११॥
मग समाधान पावूनि कमळजा ॥ म्हणे जगन्माते पार न कळे तुझा ॥ आम्हां दुर्बळांचिया काजा ॥ तुजवांचूनि कोण पावे ॥१२॥
दरिद्रदुःखें पीडिलों बहुत ॥ तुवां केलें आजि कृतार्थ ॥ ऐसें समाधान मनांत ॥ उभयतांचे तेधवां ॥१३॥
कांतेसी एकांतीं नेऊनी ॥ म्हणे हें न सांगावें कोणालागूनी ॥ पडलिया संतांचे श्रवणीं ॥ तरी मजलागोनि हांसती ॥१४॥
उभयतां एकचित्त होऊन ॥ घरांत भक्षिती उत्तमान्न ॥ बाह्यात्कारीं लोकांलागून ॥ दुर्बळावाणें दाखविती ॥१५॥
तळघरीं ठेवूनि धनसंपत्ती ॥ प्रत्यहीं पक्वान्नें भोजन करिती ॥ बाह्याकारीं दाखविती ॥ आपण विरक्त बैरागी ॥१६॥
श्मश्रु बोडोनि मैंद जैसे ॥ यात्रेकर्‍यांस मार्गीं घालिती फांसे ॥ कीं बहुरूपी सोंग आणिती जैसें ॥ संन्यासीच श्रीपाद ॥१७॥
नातरी मुलाम्याची मोहर ॥ सोज्वळ दिसे बाह्यात्कार ॥ कीं जाराचा विशेष आचार ॥ दिसे साचार जनांसी ॥१८॥
कीं पिंगळवेलीचें सुमन ॥ नेत्रांसी साजिरें दिसे दुरून ॥ कीं कृपणमित्रांचें सौजन्य ॥ वरिचेवरी जाणावें ॥१२०॥
तैसाचि परिसा भागवत ॥ लोकांसी दिसे अति विरक्त ॥ परी गृहीं संपत्ति बहुत ॥ परीक्षक जाणती ॥२१॥
जेविला अथवा उपवासी ॥ हें कळे पाहतां मुखासी ॥ निष्कपटी किंवा रागेंसीं ॥ भाषणावरूनि समजे पैं ॥२२॥
कीं स्नेहसूत्र आहे दीपकांत ॥ हें प्रकाशावरूनि कळत ॥ चातुर्य अथवा मूर्खत्व ॥ हें दृष्टीवरूनि कळताहे ॥२३॥
कार्य करूनि आला त्वरेंसीं ॥ हें चतुर ओळखिती चालण्यापासीं ॥ श्रोता दुश्चित किंवा स्वस्थ मानसीं ॥ हें वक्तयासी कळताहे ॥२४॥
तेवीं भागवताचें विरक्तपण ॥ चतुर जाणती सर्वज्ञ सद्गुण अथवा दुर्गुण ॥ न लोपे जाण सर्वथा ॥२५॥
कमळजा त्याची गृहिणी ॥ उदका चालिली एके दिनीं ॥ चंद्रभागेचें भरूनि पाणी ॥ येत परतोनी मंदिरा ॥२६॥
तों नामदेवाची निजकांता ॥ राजाबाई पतिव्रता ॥ वाटेसी भेटली अवचितां ॥ कमळजेसी तेधवां ॥२७॥
तंव राजाई म्हणे तिजकारण ॥ मी सत्वर येतें उदक भरून ॥ तोंपर्यंत या ठिकाणीं जाण ॥ उभें साजणी असावें ॥२८॥
ऐसें म्हणूनि लवलाहें ॥ उदक भरूनि आली पाहें ॥ दोघीजणी एके ठायें ॥ जाहल्या असती तेधवां ॥२९॥
अन्नवस्त्राविण बहुत कष्टी ॥ राजाई तिनें देखिली दृष्टीं ॥ म्हणे सखे जीवींच्या गोष्टी ॥ उठाउठी सांग हो ॥१३०॥
गुज सांगतां मैत्रिणीजवळी ॥ लाजों नये कदाकाळीं ॥ द्वैतकल्पना त्यागोनि सकळी ॥ खेळीमेळीं असावें ॥३१॥
यावरी राजाई बोले सहज ॥ ऐक साजणी जीवींचें गुज ॥ घरधन्यानें सांडूनि लाज गरुडध्वज आधारिला ॥३२॥
नेणेचि मान अपमानता ॥ नाहीं लौकि संसारचिंता ॥ ध्यानांत आणूनि रुक्मिणीकांता ॥ भजन करीत अखंड ॥३३॥
अन्नवस्त्र संकीर्ण घरीं ॥ कुटुंब बहु आहे पदरीं ॥ उपाय करावा कैशापरी ॥ तो सांग झडकरीं मजलागी ॥३४॥
ऐकूनि कमळजा बोले वचन ॥ नामदेव करितो जयाचें भजन ॥ त्यानें कांहीं प्रसन्न होऊन ॥ दिधलें नाहीं तुम्हांसी ॥३५॥
फळ पुष्प जरी न ये वृक्षासी ॥ तरी कासया जीवन घालावें त्यासी ॥ तेवीं भक्षावया न दे हृषीकेशी ॥ तरी कां भजनासी लागला ॥३६॥
विहिरीसी न लागतां जीवन ॥ व्यर्थचि उकरायाचा शीण ॥ तेवीं प्रसन्न न होतां रुक्मिणीरमण ॥ कासया आराधन करावें ॥३७॥
लग्नासी नेदीच अहेरा ॥ तरी कासया पाचारावा सोयरा ॥ तेवीं प्रसन्न न होतां रुक्मिणीवरा ॥ आपण पुजारी कां व्हावें ॥३८॥
औषधाचा न ये गुण ॥ तरी कां करावा रसनेसी शीण ॥ तेवीं प्रसन्न न होतां रुक्मिणीरमण ॥ कासया आराधन करावें ॥३९॥
कां क्षेत्रांत कांहीं नव्हे पिक ॥ कासया करावे कष्ट देख ॥ तेवीं प्रसन्न न होतां रमानायक ॥ त्याचे गुण कां वर्णावे ॥१४०॥
माझिया भ्रतारें साजणी ॥ प्रसन्न केली माता रुक्मिणी ॥ तिणें परिस एक आम्हांलागुनी ॥ कृपा करूनि दिधला ॥४१॥
लोह लाऊनि त्याकारण ॥ गृहीं उदंड केलें सुवर्ण ॥ तयाचे योगें मिष्टान्नभोजन ॥ करितसों मंदिरीं ॥४२॥
यावरी म्हणे राजाई ॥ परीस कैसा असतो बाई ॥ कमळजा म्हणे घरास येईं ॥ तुज ते ठायीं दाखवीन ॥४३॥
ऐसें म्हणूनि त्या अवसरा ॥ दोघी गेल्या आपुलें घरा ॥ तों एके दिवसीं तिच्या मंदिरा ॥ राजाई सत्वर पातली ॥४४॥
मग परिस आणूनि लवलाहीं ॥ तीस दाखवी ते समयीं ॥ म्हणे यास क्षणभरी घेऊन जाईं ॥ लोहा लावीं निजहस्तें ॥४५॥
सुवर्णसांठा करूनि घरीं ॥ दरिद्रदुःखातें दवडीं दूरी ॥ मागुती आणोनियां सत्वरीं ॥ देईं माझा मजपासीं ॥४६॥
आणि तुझे माझे भ्रतारासी ॥ झणीं गोष्टी कळो न देसी ॥ वचन ऐकूनि राजाईसी ॥ समाधान वाटलें ॥४७॥
घरासी जाऊन ते अवसरीं ॥ लोह धुंडिता निजमंदिरीं ॥ सुई कातर चाती तिसरी ॥ लावी झडकरी परिसासी ॥४८॥
मग सुवर्ण नेऊनि बाजारांत ॥ त्याचें द्रव्य घेतलें त्वरित ॥ सावकारासी देऊनि तेथ ॥ सर्व साहित्य आणिलें ॥४९॥
वस्त्रें भूषणें पाकपात्रें अद्भुत ॥ अन्नसामग्री घेतली बहुत ॥ स्वयंपाक करावया त्वरित ॥ हर्षयुक्त निघाली ॥१५०॥
तों दोनप्रहरीं नामदेव येऊन ॥ कांतेसी पुसें वर्तमान ॥ सामग्री आणिलीस कोठोन ॥ तें मजकारणें सांगिजे ॥५१॥
येरी म्हणे करा भोजन ॥ पुसोनि काय प्रयोजन ॥ संसारचिंता आजपासोन ॥ तुम्ही न करावी मनांत ॥५२॥
यावरी नामदेव बोले वचन ॥ सांगसी तरीच करीन भोजन ॥ राजाई संकट देखोन ॥ सांगती जाहली तेधवां ॥५३॥
म्हणे परिसा भागवत ब्राह्मणें ॥ रुक्मिणी प्रसन्न केली तेणें ॥ माता तुष्टोनियां तिणें ॥ परिस दिधला त्यालागीं ॥५४॥
तुम्ही पांडुरंगाचें करितां स्मरण ॥ घरीं तिळभरी नसे अन्न ॥ लेंकुरें खाण्यावांचून ॥ होती हैराण सर्वदा ॥५५॥
कमळजा त्याची अंतुरी ॥ तिणें परिस दिधला क्षणभरी ॥ त्यासी लोह लाऊनि झडकरी ॥ सुवर्ण मंदिरीं सांठविलें ॥५६॥
तिची माझी मैत्री सहज ॥ म्हणोनि परिस दिधला मज ॥ आपुलें साधूनि घेतलें काज ॥ आतां नेऊन देईन ॥५७॥
नामा म्हणे निजकांतेतें ॥ परिस कैसा दाखवीं मातें ॥ येरी जाऊन मंदिरातें ॥ आणूनि दावी तयासी ॥५८॥
हातींचा परिस हिरून सत्वरीं ॥ घेऊन गेला चंद्रभागेतीरीं ॥ डोहांत टाकून झडकरी ॥ विठ्ठल अंतरीं आठविला ॥५९॥
उपाधिरहित होऊन ॥ करीत बैसला नामस्मरण ॥ राजाई चिंतातुर होऊन ॥ करीत रुदन बैसली ॥१६०॥
तों येरीकडे परिसा भागवत ॥ मंदिरासी आला त्वरित ॥ परिस असे सांबळींत ॥ तंव तो न दिसे त्या ठायीं ॥६१॥
कांतेसी म्हणे लागलें वेड ॥ कैसी हारविली जन्माची जोड ॥ जे उदंड यत्न करितां अवघड ॥ तरी तो न जोडे सर्वथा ॥६२॥
येरी म्हणे राजाईनें जाण ॥ नेला घडिभर मागोन ॥ दरिद्रें पीडिली म्हणोन ॥ क्षणभर जाण दिधला म्यां ॥६३॥
परिसा म्हणे कांतेलागूनी ॥ तेंचि भय होतें माझें मनीं ॥ आतां सत्वर तेथें जाऊनी ॥ घेऊनि येईं आतांचि ॥६४॥
मग कमळजा त्वरेनें ते काळीं ॥ नामदेवाचें गृहासी आली ॥ राजाईस पुसे ते वेळीं ॥ कोठें ठेविली निजवस्तु ॥६५॥
येरी म्हणे वो साजणी ॥ अपराध घडला मजकडोनी ॥ घरासी येऊनियां घरधनी ॥ गेले घेऊनि बाहेर ॥६६॥
आतां येतील करूनि स्नान ॥ मग मी तुमचा देईन आणून ॥ कमळजा म्हणे तिजकारण ॥ आतांचि सत्वर देइंजे ॥६७॥
राजाई चिंताक्रांत मानसीं ॥ म्हणे चाल जाऊं तयापासीं ॥ भीमातीरीं येऊनि वेगेंसीं ॥ नामयापासीं पातल्या ॥६८॥
त्यानें नेत्र झांकूनी ॥ ध्यानांत आणिला चक्रपाणी ॥ विठ्ठलनाम प्रेमेंकरूनी ॥ जपत बैसला निजप्रीतीं ॥६९॥
कांता म्हणे नामयाला ॥ तुम्हीं कोठें परिस ठेविला ॥ कमळजा आली मागावया ॥ इजला दिधला पाहिजे ॥१७०॥
ऐकोनि म्हणे विष्णुभक्त ॥ टाकूनि दिधला उदकांत ॥ ऐसी ऐकूनियां मात ॥ जाहल्या संतप्त उभयतां ॥७१॥
दीर्घस्वरें दोघी रडती ॥ हृदय पिटोनि आक्रंदती ॥ नर नारी पयावया येती ॥ वृत्तांत पुसती तेधवां ॥७२॥
राजाई सांगतां वृत्तांत सकळ ॥ परिसा भागवतासी कळलें तत्काळ ॥ मग तो पिटीत वक्षःस्थळ ॥ नामयापासीं पातला ॥७३॥
लोकांसी सांगे ते वेळां ॥ येणेंचि परिस अभिलाषिला ॥ आणि आम्हांसी म्हणतो टाकिला ॥ चंद्रभागेचे डोहांत ॥७४॥
नानापरींचे त्रिविध जन ॥ दोघांसी निंदिती दोन्हीं गुण ॥ कोणी भाविक भक्तजन ॥ करिती स्तवन नामयाचें ॥७५॥
म्हणती सोनें आणी माती ॥ विष्णुदासासी सारखीं दिसती ॥ परिसाचा अभिलाष चित्तीं ॥ हा कल्पांतीं करीना ॥७६॥
कुटिल म्हणती ते वेळां ॥ मैंद घालिती तुळसीमाळा ॥ ब्राह्मणाचा परिस अभिलाषिला ॥ हा कैसा भला म्हणावा ॥७७॥
परिसा होऊनि सद्गद ॥ नामयासी बोले प्रसिद्ध ॥ देव भक्त दोघेही मैंद ॥ माझें घर कां बुडविलें ॥७८॥
विरक्त म्हणविसी आपणास ॥ आणि परिसाचा केला अभिलाष ॥ ही गोष्ट मान्य संतांस ॥ बरवें चित्तीं विचारीं ॥७९॥
यावरी म्हणे विष्णुदास ॥ आपणा कासया पाहिजे परिस ॥ तुम्ही आपणासी उदास ॥ बाह्यात्कारीं म्हणवितां ॥१८०॥
म्हणूनि चंद्रभागेचे डोहीं ॥ टाकूनि दिधला लवलाहीं ॥ असत्य वाटेल तरी ये समयीं ॥ जाऊनि पाहें उदकांत ॥८१॥
एकोनि नामयाचें वचन ॥ हांसों लागले सकळ जन ॥ म्हणती वाळूंत परिस कोण ॥ ओळखी सुजाण कळेना ॥८२॥
मग उदकांत उडी टाकूनि देख ॥ जनांसी दाखविलें कौतुक ॥ वाळू घेऊनि ओंजळ एक ॥ म्हणे परिस बहु आणिले ॥८३॥
तुमचा कोणता तो पाहून ॥ घ्या यांतील ओळखून ॥ ऐकूनि नामयाचें वचन ॥ सकळ लोक हांसती ॥८४॥
एक म्हणती खडे परिस ॥ समान दिसती याचे दृष्टीस ॥ एक म्हणती या समयास ॥ प्रचीत पाहूं आपण ॥८५॥
मग सुया आणूनि मुष्टिभरी ॥ खड्यांसी लावील्या झडकरी ॥ तों तितुकेही परिस निर्धारीं ॥ नवल अंतरीं वाटलें ॥८६॥
म्हणती हात स्पर्शोनि खड्यांस ॥ नामयानें केले परिस ॥ म्हणोनि हर्ष वाटला जनांस ॥ धन्य धन्य म्हणताती ॥८७॥
जयजयकारें भक्तमंडळी ॥ प्रेमानंदें पिटिती टाळी ॥ निंदक कुटिल मंडळी ॥ अधोमुखें पाहती ॥८८॥
चमत्कार देखोनि ऐसा ॥ अनुताप पावला भागवत परिसा ॥ नामयास म्हणे तुजऐसा ॥ सभाग्य नसेच भूमंडळीं ॥८९॥
म्यां रुक्मिणीचें करून आराधन ॥ एक परिस घेतला मागोन ॥ त्याजसाठीं देत होतों प्राण ॥ तुमचें महिमान न कळतां ॥१९०॥
तुमचे चरण लागती जेथें ॥ सकल ऐश्वर्य ओळंगे तेथें ॥ आतां परिस नलगे मातें ॥ अभय हस्तातें इच्छितों ॥९१॥
नामदेवें परिस काढिले होते ॥ ते भिरकाविले उदकांत ॥ परिसा भागवत शरणागत ॥ जाहला अंकित नामयाचा ॥९२॥
विष्णुदासाचा उपदेश घेऊन ॥ तयासी जाहलें दिव्य ज्ञान ॥ पुढें चरित्र रसाळ गहन ॥ ऐकतां श्रवण सुखावती ॥९३॥
असो भक्तविजय ग्रंथ विशेष ॥ हाचि केवळ सुधारस ॥ आवडीं सेविती तयांस ॥ भवरोग सर्वथा बाधेना ॥९४॥
कीं संपूर्ण हेचि पौर्णिमा ॥ यांत भक्तविजय उगवला ॥ चंद्रमा वैष्णव चकोरांच्या मना ॥ परम आल्हाद वाटला ॥९५॥  
अभक्त द्वेषी निंदकांस ॥ न रोचे याचा दिव्य प्रकाश ॥ म्हणूनि द्वेषें निंदिती यास ॥ नाहीं विश्वास अंतरीं ॥९६॥
असो तयांचे करितां वर्णन ॥ वाग्देवीस व्यर्थचि शीण ॥ आतां सत्वशील जे का सज्जन ॥ देवोत अवधान निजप्रीतीं ॥९७॥
श्रीभीमातीरवासी रुक्मिणीपती ॥ व्यापूनि उरलासे त्रिजगतीं ॥ त्याचे कृपेनें महीपती ॥ निरूपण ग्रंथीं लिहितसे ॥९८॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ अष्टदशाध्याय रसाळ हा ॥१९९॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥
॥ श्रीभक्तविजय अष्टदशाध्याय समाप्त ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel