चंडीगढ! पंजाब आणि हरियाणाच्या वेशीवर वसलेले सुंदर शहर!! दोन राज्यांची एक राजधानी!! नियोजनबद्ध मांडणी करून बांधण्यात आलेला केंद्रशासित प्रदेश! आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही उत्तम नियोजन आणि वास्तू विशारदाचा उत्तम नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. देवी चण्डिकेचा किल्ला म्हणून या शहराला 'चंडीगढ' असे नाव देण्यात आले. स्वतंत्र भारतात नियोजन आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने वसवण्यात आलेले हे पहिले शहर होते. भारताच्या आधुनिकतेकडे सुरू झालेल्या वाटचालीचा तो एक संकेत होता. देवी चण्डिकेच्या या शहराला वसवण्यात सिंहाचा वाटा उचलणारी एक दुर्गाही होती. भारतातील स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, याचे संपूर्ण जगाला आपल्या कार्यातून तिने प्रात्यक्षिक दिले. ती होती भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली वास्तुविशारद उर्मिला युली चौधरी!!

उत्तर प्रदेशातील शहाजहॉंपूर येथे १९२३ साली उर्मिला यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांच्या कामाचे स्वरूप असे होते की त्यामुळे त्यांना अल्प वयात जगभर प्रवास करण्याचा आणि इतर प्रदेश पाहण्याचा योग आला. त्यामुळे त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या देशात झाले आणि साहजिकच त्यांचे क्षितिज सहजच विस्तारले. उर्मिला यांचे बहुसांस्कृतिक आणि बहुआयामी व्यक्तिमत्व घडले ते यामुळेच! जपानच्या कैम्ब्रिज स्कूल मधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विश्वविद्यालयातून वास्तुशास्त्राचा अभ्यास केला. ही पदवी घेत असतानाच सोबतच त्यांनी जूलियन एशबोर्न स्कूल ऑफ आर्ट येथून गायन आणि पियानो वादनाचा अभ्यास केला. त्या नंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला अमेरिकेतील न्यूजर्सी शहराकडे! तिथे त्यांनी सिरॅमिकमध्ये पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आणि काही काळ तेथेच नोकरी करू लागल्या. पृथ्वीवरील तीन वेगवेगळ्या दिशांना जाऊन ज्ञानार्जन केले होते त्यांनी. मात्र आपल्या मातृभूमीच्या विसर त्यांना पडला नव्हता. दरम्यानच्या काळात भारत स्वतंत्र झाला होता. देश आपल्या स्वतंत्र अस्तित्वासह नव्या आयुष्याला सुरुवात करत होता. प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकत असताना देशाला गरज होती काही नियोजनबद्ध कामांची. त्यापैकीच एक होते योजनाबद्ध शहरांची स्थापना!! भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पंजाबची राजधानी असणारे लाहोर शहर पाकिस्तान प्रांतात गेले होते. त्यामुळे पंजाबसाठी नवी राजधानी निवडणे गरजेचे होते. त्यावेळी नवीन केंद्रशासित प्रदेशाची उभारणी करावी व पंजाब-हरियाणासाठी राजधानी एकच करावी असे विचारांती ठरवण्यात आले.

सन १९५१, ली कोर्बसियर, पियरे जीनरनेट, मैक्सवेल फ्राई और जेन ड्रू यांच्या समितीवर चंदीगड शहराच्या निर्माणाची जबाबदारी टाकण्यात आली होती. आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आणि शिक्षणाचा फायदा आपल्या मातृभूमीला व्हावा म्हणून उत्साहाने उर्मिला या समितीच्या सदस्य झाल्या. देवी चण्डिकेच्या किल्ल्याच्या उभारणीत भरतभूमीची दुर्गा हातभार लावू लागली !! आपली प्रतिभा आणि कामातील सचोटी यामुळे महिला असूनही त्यांनी संपूर्ण टीमचा विश्वास सहज संपादन केला होता. उर्मिला यांनी महिलांच्या गव्हर्नमेंट पॉलिटेकनिकची मुख्य इमारत, होम सायन्स कॉलेजच्या वसतिगृहाची इमारत, सेंट जॉन्स शाळेची इमारत, राज्यमंत्र्यांच्या निवासाचा परिसर, सरकारी निवासाच्या बहुमजली इमारती, सरकारी शाळा याशिवाय अमृतसर आणि मोहाली येथील काही प्रमुख केंद्राच्या वास्तू स्थापत्यावर काम केले. चंडीगढ शहर रचनेचा काळ त्यांच्या संपूर्ण करिअरमधील सुवर्ण काळ होता. चंदीगडच्या बांधणीचा इतिहास सांगताना उर्मिला यांच्या नावाशिवाय तो सांगणे ही निव्वळ अशक्य गोष्ट आहे इतके त्यांचे योगदान बहुमोल आहे.

सन १९५१ ते १९८१ असा प्रदीर्घ तीन दशकांच्या चंदीगड निर्माणाचा कार्यभार उर्मिला यांच्याकडे होता. त्याशिवाय १९६३ ते १९६५ या काळात दिल्लीतील स्कूल ऑफ प्लानिंग एंड आर्किटेक्चर येथील मुख्याध्यापक पदाचा कार्यभार उर्मिला यांच्यावर सोपवण्यात आला. त्यांनी चंदीगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्येही शिकवले. तिथे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना उर्मिला एक हुशार शिक्षक म्हणून आठवतात. त्यांची काटेकोर शिस्त आणि कामातील एकाग्रता यामुळे उर्मिला यांच्याविषयी त्यांच्या मनात भीतीयुक्त आदर असायचा. सन १९७१ ते १९७६ या काळात हरियाणा आणि १९७६ ते १९८१ या काळात पंजाबच्या प्रमुख वास्तुकार म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. यात मुख्यत्वे जनरल हॉस्पिटल, त्यांचे वसतिगृह इत्यादींच्या रचनाचे काम होते. पवित्रता, सत्य, विनम्रता, न्यूनतावाद आणि अर्थव्यवस्थेच्या तत्वांवर उर्मिला यांच्या कामाचा डोलारा उभा राहिला होता. त्यामुळे आजही त्यात दोष काढायला कोणतीही जागा नाही. त्यांनी स्वत: साठी आणि काही प्रकल्पांसाठी फर्निचरही डिझाइन केले. राष्ट्रपतींनी कमी किंमतीच्या फर्निचरची रचना केल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या  त्या सहकारी झाल्या आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटीश आर्किटेक्ट्समध्ये सहकारी म्हणून निवडली झालेल्या त्या पहिली भारतीय महिला होत्या. चंदीगड आणि फ्रान्समधील संबंध कायम ठेवण्यासाठी युली यांना अलायन्स फ्रँचायझ दे चंदीगडची स्थापना करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, त्यातील त्या पहिल्या अध्यक्षा झाल्या.

हुशार आणि बहुमुखी अशा उर्मिला यांना विविध क्षेत्रात रस होता. त्यांना नाटक लिहिण्यात वेळ घालवायचा खूप आवडायचा. चंदीगड अ‍ॅमेच्योर ड्रामाटिक सोसायटीची स्थापना करून चंदीगडमध्ये नाटय़गृहात प्रवेश करण्याचे श्रेय त्यांना देण्यात आले. तिथे इंग्रजी नाटकांचे आयोजन केले जात असे. त्या उत्तम चित्रकारही होत्या. त्यांच्या कलागुणांनी लेखन व अध्यापन क्षेत्रातही भर घातली. महत्त्वपूर्ण व्यावसायिक जर्नल्स, मासिके आणि वर्तमानपत्रांमध्येही त्या नियमितपणे लेखन करत. सेवानिवृत्तीनंतर तिने १९८३मध्ये अलायन्स फ्रँचायझ दे चंदीगडची स्थापना केली आणि द ट्रिब्यून वृत्तपत्राच्या सॅटरडे प्लस परिशिष्टासाठी विविध विषयांवर नियमितपणे लिखाण केले. अखेरीस त्यांनी फ्रेंच भाषेतून 'थ्री ह्युमन अ‍ॅस्टॅब्लिशमेंट्स' या ले कॉर्ब्युझर यांच्या पुस्तकाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. आपल्या वास्तुशास्त्राबरोबरच्या काळाच्या आठवणी सांगणारे 'मेमरीज ऑफ ले कॉर्ब्युझियर' हे पुस्तकही त्यांनी लिहिले. केवढे हे बहुआयामी व्यक्तिमत्व!!

'मॉडर्न आर्किटेक्चरचा ग्रँड डेम' म्हणून ओळखल्या जाणार्‍या उर्मिला युली चौधरी हे आधुनिक स्त्री म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात प्रकाशात आलेले नाव होते. प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या आधुनिक भारताच्या नव्या चेहऱ्याची त्या प्रतिमा होत्या. पुरुषांची मक्तेदारी मोडून त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीदेखील काम करू शकते आणि यशाचे नवे आदर्श निर्माण करू शकते याचे उत्तम उदाहरण होत्या उर्मिला!! परंतु त्यांच्या या कामामुळे चंदीगडच्या स्थापत्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचा शब्दसंग्रह समृद्ध होत असताना, त्यांच्या योगदानास योग्य मान्यता मिळाली नाही असे आज राहून राहून वाटते. आपल्याकडचे परदेशात शिक्षणासाठी गेलेले किती जण कर्मभूमी म्हणून पुन्हा मातृभूमीचीच निवड करतात? परदेशातील तंत्रज्ञान, शिक्षण यांचा उपयोग स्वदेशाच्या प्रगतीसाठी करावा अशी किती जणांना तळमळ असते? स्त्री की पुरुष हा मुद्दा नाही, पण संपूर्ण पृथ्वीच्या वेगवेगळ्या दिशांना जाऊन शिक्षण घेणे आणि न विसरता आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खारीचा वाटा उचलणे ही सोपी गोष्ट नाही. सहा महिने परदेशातील चकाचक वातावरण पाहिले, अनुभवले की पुन्हा स्वदेशात येऊन राहणे अशक्य वाटणारे आज कमी नाहीत. मग जगाचे तीन कोपरे फिरून आलेली, तिथल्या संस्कृतीत वाढलेली, जगलेली एक स्त्री मायदेशाला आपली कर्मभूमी बनवते आणि त्या कर्मभूमीतच अखेरच्या श्वासापर्यंत राहते हा सुद्धा एक आदर्शच नाही का? तर अशी होती आशियातील आणि भारतातील पहिली महिला वास्तुविशारद!! आपल्यापैकी किती जणांना माहिती होती ही खरीखुरी दुर्गा भरतभूमीची....

~मैत्रेयी पंडित

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel