मध्यंतरी एका विद्यार्थ्याचं समुपदेशन करीत असताना त्याच्या पालकांशी म्हणजे आईवडिलांशी बोलणं सुरु होतं. प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी ही चर्चा आवश्यक होती. चर्चा करताना समस्याग्रस्त विद्यार्थ्याच्या आई-वडिलांमधील संघर्ष आणि विविध मुद्यांवरील मतभेद स्पष्ट होत होते. या संघर्षाचा थेट परिणाम मुलांच्या संगोपनावर होवूू शकतो. हे लक्षात घेवून मी आई-वडिलांशी मुलांच्या संगोपनाबाबत स्वतंत्र आणि सविस्तर चर्चा केली. अशी चर्चा करताना मुलाच्या वडिलांनी मला एक प्रश्न विचारला. तो साधारण माणसाला विचार करायला भाग पाडणारा असाच होता. काय होता तो प्रश्न? याची उत्सुकता तुम्हालाही लागून राहीली असेल. मी तुमची ही उत्सुकता अधिक ताणणार नाही.

त्या गृहस्थाचा प्रश्न होता - "मुलांच्या संगोपनात वडिलांची भूमिका दुय्यम किंवा कमी महत्वाची असतेे का?"

मी या प्रश्नावर काही उत्तर देण्याऐवजी त्या गृहस्थालाच अधिक बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी त्यांना उलट प्रश्न केला की, "तुम्हाला असं का वाटतंय? तुम्हाला वयाच्या साठीत आल्यावर असा प्रश्न का पडला आहे?"

उतरादाखल थोडंसं स्मित करीत तो गृहस्थ म्हणाला-  "सध्याच्या पिढीतला मुलगा आपल्या वडिलांना  'तुम्ही माझ्यासाठी काय केलंय?' असं बिनधास्तपणे विचारतो. तसा प्रश्न तो आईला मात्र विचारताना दिसत नाही. कदाचित आई त्याला जन्म देते, न्हावूू-माखू घालते, खाऊ-पिऊ घालते. त्याची सगळी काळजी घेते म्हणून मुलांना हा प्रश्न आईला विचारावा असे वाटत नसेल.  इथपर्यंत मी समजू शकतो. पण म्हणून वडील मुलांसाठी काहीच करीत नाहीत असा त्याचा अर्थ होतो का?  मुलांच्या संगोपनासाठी वडिलांची नेमकी काय भूमिका असते? ती मुलांना कशी समजणार? "

मुलाच्या समुपदेशनाची गाडी वेगळंच वळण घेत आहे हे माझ्या लक्षात आलं होतं; परंतू त्याच वेळी कोणतेही आढेवेढे न घेता सदर गृहस्थ आपली पित्याची भूमिका प्रामाणिकपणे समजून घेवू इच्छित आहेे याबद्दल मला खात्री वाटू लागली होती. म्हणून मी त्यांचं बोलणं ऐकून घेत होतो, समजून घेत होतो.

ते गृहस्थ पुढं बोलतच होते - " बाप म्हणून कुंटूबाच्या गरजांची पूर्तता करणं, त्यांचं ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासूून रक्षण करणं, त्यांना योग्य निवारा मिळवून देणं, घरात लागणारं वाण-सामान आणून देणं, त्यांची आवड-निवड समजून घेत मुलांची व कुटूंबाची हौस-मौज पुरवणं, त्यांचे लाड करणं, कौतूक करणं, त्यांच्यावर प्रेम करणं आणि या सगळ्यासाठी लागणारा पैसा मिळविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत काबाडकष्ट करत राहणं हे बापाचं अर्थात वडिलांचं कर्तव्य आहेे. जगातलेेे बहुतेक बाप कित्येकदा आपलं मन मारुन हे कर्तव्य बजावत असतात. अशाही परिस्थितीत मुलं आपल्या बापाला 'तुम्ही माझ्यासाठी काय केलंय?' असा प्रश्न विचारीत असतील तर याचा अर्थ काय लावायचा?"

आपल्या वाट्याला आलेली पित्याची भूमिका प्रामाणिक व चोखपणे बजावून कायम कर्तव्यदक्ष राहिलेल्या कुणाही पुरुषाला छळेल असा प्रश्न त्या गृहस्थानं मांडला होता.

आपल्यापैकी अनेकांच्या कुटूंबात किंवा आपल्या आजूबाजूला असा प्रश्न उराशी कवटाळून आतल्या आत झुरणारी अनेक 'वडील' माणसं आपण पाहिली असतील. कदाचित आपण स्वतःही या भूमिकेत जगत असाल. हे असं का होतं? वडिलकीच्या नात्यानं एखादा पुरुष असा आपला जीव कष्टवून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करीत असताना त्याच्या मुलांकडून त्याला दुय्यम ठरवलं जात असेल तर ते कितपत योग्य आहे? आई आणि वडिलांमध्येे अशी तुलना मुलं का करीत असतील? अशी तुलना करणंं बरोबर आहे का? अशा अनेक प्रश्नांंची उत्तरं शोधणं आता अनिवार्य आहे हेे माझ्या ध्यानात आलं.

मूळात आई श्रेष्ठ की वडील? हा प्रश्नच गैरलागू आहे. लहानपणी मुलांची मस्करी करण्यासाठी "बाळा तू कोणाचा रे?" असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. उत्तरादाखल मुलं पटकन आपल्या वडिलांचं नाव सांगतात. चेष्टेसाठीच प्रश्न विचारलेला असल्यामुळं लगेच पुढचा प्रश्न येतो - "म्हणजे तूू तुझ्या आईचा नाहीस का?" हे ऐकल्यावर आपलंं काहीतरी चुकलंय असं वाटल्यानं तेेे मूल खजिल होतंं आणि आपल्या उत्तरात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत म्हणतं - "मी माझ्या आई आणि बाबांचा, दोघांचाही आहे !"

जीवशास्त्रीय सत्य माहित नसण्याच्या वयात मुलानं दिलेलं हे उत्तर मात्र शास्त्रीय दृष्टीनं अगदीच अचूक असतंं!

याप्रसंगी मला एक वैज्ञानिक गोष्ट आठवते. ती अशी की, दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सिजन मिळून पाणी तयार होतं. पाणी बनण्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण वेगवेगळं असलं तरी दोघांचं असणं मात्र अगदी अपरिहार्य आहे. अशा वेळी हायड्रोजन श्रेष्ठ की ऑक्सिजन? हा प्रश्न जसा गैरलागूू ठरतो, अगदी तसाच आई श्रेष्ठ की वडील? हा प्रश्नही गैरलागू आहे. दोघांचंंही असणं अपरिहार्य आहे त्यामुळंच त्याचं दोघांचंही महत्त्व समानतेनं अबाधित राहातं. त्यांच्यात श्रेष्ठ - कनिष्ठ किंवा कुणाचं महत्त्वाचं स्थान आणि कुणाचं कमी महत्वाचं स्थान अशी तुलना करता येणार नाही.

असं असुनही मुलं आईवडिलांमध्येे तुलनात्मक फरक करुन त्यांचंं आपल्या जीवनातील कमी -अधिक महत्त्व ठरवतात असं दिसून येत आहे. असा फरक करताना त्यांना आई-वडिलांचा मिळणारा सहवास आणि या सहवासात त्यांच्याकडून मिळणारं भावनिक प्रेम, त्यांच्या प्रेम, लाड, हट्ट, कौतूक, शाबासकी, संरक्षण, काळजी यासारख्या भावनिक व मानसिक गरजांची पूर्तता कोण करतं हेे महत्त्वाचं ठरतं. भारतीय समाजव्यवस्थेेेनं निर्माण केलेल्या कुटूंबव्यवस्थेत ही सगळी आईची जबाबदारी आहे असं मानलं जातं. आपल्या व्यवस्थेनुसार मुलं अधिक काळ आईच्या सहवासात असतात. साहजिकच मुलांना आई महत्वाची वाटू लागते. काही कुटूंबात वडील पुरुषांचा मुलांशी संपर्क येत नाही, त्यांच्यात संवादही होत नाही. अशावेळी मुलांच्या मनात या वडिल पुरुषाबद्दलची प्रेमभावना वाढीस लागूूू शकत नाही. अशी कुटूंबं समृद्ध असली तरीही सुखी मात्र असु शकत नाहीत !

अलिकडच्या काळात हे चित्र बदलू लागले आहे. एकत्र किंवा संयुक्त कुटूंब व्यवस्था हळहळू नामशेष होऊन विभक्त कुटूंबांची संख्या वाढत चाललीआहे. कुटूंबातील माणसांची संख्या मर्यादित होऊ लागली आहे, शिवाय अर्थार्जनासाठी स्त्रियाही घराबाहेर पडू लागल्या आहेत. त्यामूळे तिची कुटूंबातील मुलांबाबतची जबाबदारी आता काही प्रमाणात पुरुषांनी स्वीकारली आहे असं दिसतं आहे. सध्याच्या काळातील वडील पुरुष आपल्या मुलांच्या प्रेम, लाड, हट्ट, कौतूक, शाबासकी, संरक्षण, काळजी यासारख्या भावनिक व मानसिक गरजांची पूर्तता करताना मोठ्या प्रमाणात दिसतात. असं असुनही काही कुटूंबांतील मुलांच्या मनात आपल्या वडिलांचेे स्थान दुय्यम राहतं. हेच  समुपदेशनासाठी माझ्याकडे आलेल्या केसमधून स्पष्ट होतं. अशावेळी आई - वडिल- मुलेे असा परस्पर संवादाचा एक त्रिकोण विचारात घ्यावा लागतो. आई वडिलांच्या भूमिकेतल्या या स्त्री-पुरुषांमध्ये काही बेबनाव असेल, दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून विशेष मतभेद असतील तर या दोघांंकडून मुलांशी होणारा संवाद महत्वाचा ठरतो. त्यांचा मुलांशी होणारा संवाद केवळ आत्मप्रौढी प्रकट करणारा असेल, आपल्या जोडीदाराबद्दल सातत्याने नाराजी व्यक्त करणारा असेल तर संबंधित व्यक्तीकडे पाहाण्याचा मुलांचा दृष्टीकोन त्याच प्रकारे विकसित होतो. वडील चांगला कामधंदा करीत नसतील, त्यांचे उत्पन्न खूप कमी असेल, त्यांना काही व्यसनं असतील किंवा वाईट सवयी असतील तर अशा स्थितीत आई मुलांना नकळतपणे वडिलांच्या या गोष्टीबाबत सांगत राहाते. तिच्या या सांगण्यामागे मुलांना परिस्थितीची जाणीव करुन देवून कुटूंबाचे हित साधण्याचा उदात्त हेतू असला तरीही नकळत मुलांच्या मनातलं वडिलांचं स्थान डळमळीत होतं. त्यांच्याबद्दल आदर वाटेनासा होतो, प्रेम कमी होतं आणि त्यांनी केलेले सर्व कष्ट विसरुन जात कधीतरी प्रश्न विचारला जातो -"तुम्ही आमच्यासाठी काय केलं?"

याचा अर्थ असा नव्हे की, अशा कुटूंबातल्या स्त्रीनंं आपलं कुटूंब सुखी व्हावं, सुखी राहावं यासाठी आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल आपल्या मुलांंशी काहीच बोलूू नये. जरुर बोललं पाहिजे परंतू असं बोलताना, वडिलांच्या वाईट गोष्टीबद्दल सांगताना त्यांंच्या कष्टाबद्दल, त्यांच्या कुटूंबासाठीच्या योगदानाबद्दल आईनं जाणीवपूर्वक अधिक बोलणं गरजेचं आहे. मुलांच्या मनात त्यांच्या वडिलांची चांगली प्रतिमा तयार करणं हेे संपूर्णपणे आईच्याच हातात असतं! एका अर्थानं आपल्या कुंटूबाच्या सुखाची आणि सौख्याची किल्ली 'आई' नावाच्या स्त्रीच्या हाती असते हेच खरं !

© श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी अहमदनगर
संपर्क: ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel