एक ऋषी ब-याच काळा पासून यज्ञ करायचा प्रयत्न होते परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. त्यांच्या आश्रमा पासून तेंव्हा राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची हि उदासी पाहिली आणि म्हणाले," ऋषिवर! तुम्ही असे उदास का? माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होतो आहे का? माझ्या राज्यातील कोणी उदास, निराश राहिलेले मला योग्य वाटत नाही."
त्यावर ऋषी म्हणाले," महाराज! मी ब-याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे पण जसा अग्नी मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही." त्यावर राजे विक्रमादित्य म्यानातील तलवार काढून म्हणाले," एवढीच गोष्ट आहे ना! मी आता या क्षणी संकल्प करतो कि, जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझे शीर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन." यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव राजांना म्हणाले," मी तुझ्या वर प्रसन्न आहे! वर माग! " त्यावर राजा म्हणाले " या ऋषींची इच्छा पूर्ण करा ! त्यांचा यज्ञ संपूर्ण करा! त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांच्छित फळ त्यांना मिळू दे!" यावर ऋषी म्हणाले " राजा ! तुम्ही एकतर अग्नीस प्रसन्न करून घेतले. पण मी हि खूप प्रयत्न केले होते कि! पण आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नीस प्रकट कसे काय केले? " यावर राजा काही बोलण्या आधीच अग्निदेव उत्तरले," ऋषिवर! राजाने जे काही केले त्यात त्यांचा स्वत:चा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपुर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो."
तात्पर्य-संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते.