अक्षय वसंत साळुंखे

सांग सांग भोला नाथ ,पाऊस पडेल का ?
शाळेभोवती तळे साचून, सुट्टी मिळेल का ?

खूप दिवसा नंतर सकाळी  रेडिओ वर हे गाणे ऐकण्यातआलं, आणि हळू हळू शाळेतल्या त्या थोड्या बालिश ,खट्याळ , अवखळ आणि गोड आठवणी  डोळ्यासमोर येऊ लागल्या.

लहापणापासूनच मला शाळेची खूप आवड होती .जिथं काही मुले शाळेत नाही जायचं म्हणून रडतात तिथं मी शाळेत जाण्यासाठी हट्ट करायचो.तसा मी शाळेत हुशार होतो असे नाही, पण आमचं घर गावापासून जरा लांबच होत, त्यामुळेच घरापेक्षा मला शाळाच खूप आवडायची ,शाळेत आल्यावर मला माझे मित्र भेटायचे , त्यांच्यासोबत खेळायला मिळायचं, त्यामुळेच की काय मी घरापेक्षा शाळेत जास्त रमायचो.शाळा म्हटलं की मधली सुट्टी आली,मधली सुट्टी आली की ती धमाल आली ,ती पेरूच्या बागेतली चोरी आली . आणि  शाळे समोरच्या टपरीतल्या गोळ्या-बिस्किटांसाठीचा दंगा आला,घरून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी आली.

आमची मधली सुट्टी दुपारी दोन वाजता व्हायची , त्याच्या अगोदर असायचा तो गणित चा ,सकाळपासूनचां उपवास सोडण्याच्या घाईत असलेली आम्ही पोरं,आमच्या मास्तरांनी काही सांगितले तरी , आमच्या डोक्यात मात्र बाकी शून्य असायची. भूक न सहन झालेले   काही नग तर चालू तासातचआपला डबा उघडून आपल्या तोंडाचा बोकणा भरून पोटाची आग शांत करत असत . अशातच दोनच्या सुट्टी ची बेल व्हायची आणि आम्ही हातातील सगळं काही दफ्तरात फेकून .. शाळेच्या समोर असलेल्या वडाच्या झाडाखालच्या पारावर जेवायला बसायचो , सकाळ पासून झालेल्या तासांचा आढावा..आणि कुणी कोंच्या मास्तरा ला  मार चुकवण्यासाठी लावलेला चूना प्रत्येक जण रंगवून सांगत. त्यातच कोणी एकसारखी भाजी आणली असेल तर हळूच तो दुसऱ्याला चिमटा काढायचा,अशा या खोडी करत  जेवण कधी संपून जायचं ते कळायचंच  नाही.

जेवण झाल्याल्यानंतर असायची ती खेळण्याची घाई .आमची शाळा गावात असल्या मुळे आमचे खेळ पण गावठी ,बिना भांडवली. कोणी शिवा-शिवी, खेळे ,कोणी लपा छपी..पण आमच्या ग्रुपचा आवडता खेळ म्हणजे आबा-धबी .याचा शोध कोणी लावला ..काय माहित नाही पण ..यातील एक गंमत म्हणजे यासाठी लागणारा बॉल बनविणे,हा बॉल शक्यतो चिंध्यांचा असायचा ,तो जेवढा घट्ट व्हायचा तेवढा जास्त समोरच्याला  लागायचा. जसजशी सुट्टी संपायची तसतशी बॉलची लाईफ संपायची.

शाळेतली एक बालिश आठवण जी आज जरी आठवली तरी खूप हसायला येते आणि आपण किती वेडे होतो याची जाणीव होते .आमच्या शाळेपासून जवळच एक नदी होती ,नदीकाठी  स्मशानभूमी असल्यामुळे गावातील कोणी कचकले ,की अंत्ययात्रा शाळेपासूनच जायची,आम्ही खिडकीजवळ बसून असल्यामुळे, ती जाताना दिसताच आमची एकच घाई असायची ती म्हणजे अंत्ययात्रेतील पैसे गोळा करायची,मधली सुट्टी झाली की आम्ही सर्व पळतच नदीकडे सुटायचो आणि ते पैसे गोळा करून त्या पैश्यांचे आईसक्रिम खायचो .त्या पैश्यांसाठी कधी कधी आमची भांडणं पण व्हायची.

जसजसं मोठे होत गेलो तसतशी मधली सुट्टी पण बदलत गेली. अगोदर शाळेत असताना मधल्या सुट्टीत खेळायचो ,बागडायचो , पेरूच्या बागेत जाऊन पेरू  आणायचो आणि मित्रांसोबत ती तिखट-मीठ लावून खायचो ती मजा आता विकत घेतलेल्या  कोणत्याही फळात येत नाही.  

कॉलेजमध्ये आल्यानंतर मधल्या सुट्टीतील खेळाची जागा , मोबाईल मधल्या गेम्स आणि व्हॉट्स अप आणि फेसबुकवरील गप्पांत बदलली. दुपारी जेवल्या नंतर आमच्या ग्रुपचा एक प्रोग्रॅम असायचा program season ज्यामध्ये आमचा ग्रुप झेरॉक्स सेंटर जवळच्या बाकावर बसायचा आणि तेथे येरझाऱ्या घालणाऱ्या  मुलींना पाहत बसायचा, दररोज च्या त्या season मुळे काहीना व्हॅलेंटाईन दिवशी त्याचे प्रेम भेटायचे तर आमच्या सारख्या काहींना त्यांच्या होणाऱ्या वहिनी.

खरंच मधली सुट्टी ही नेहमीच्या सुट्टी पेक्षा खूप वेगळी असते .ती जरी रोज येत असली तरी हवीहवीशी असते ,जरी कमी वेळाची असली तरी सर्व थकवा घालवून मनाला  शांत  करणारी असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel