भगवंत असण्याची जी स्थिति तिचे नाव भक्ती; आणि हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने राहणे याचे नाव वैराग्य. सर्व काही रामाचे आहे असे समजणे, म्हणजे सर्वस्व रामास अर्पण करणे होय. परमार्थाच्या आड काय येते? धन, सुत, दारा, वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व, ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे, ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याची बायको मेली किंवा नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तर तो विरक्तच आहे. आहे ते परमात्म्याने दिले आहे, आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. संसार हा नश्वर आहे हे ओळखून वागावयाचे आहे. तो टाकता येत नाही; त्यात राहून आसक्ती न ठेवली की तो टाकल्यासारखाच नाही का? फळाची आशा न करता सत्कार्य करणे हे भक्तीचे लक्षण आहे, आणि कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणे हे वैराग्याचे लक्षण आहे. आसक्ती न ठेवता कर्तव्याच्या गोष्टी करणे ही तपश्चर्या होय. देहसुखाची अनासक्ती किंवा हवेनकोपण टाकणे म्हणजेच वैराग्य. खरोखर, विचार करा, प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. अमुक हवे अथवा नको, असे कशाला म्हणावे? असे न म्हणता, रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले. जो रामाजवळ विषय मागतो, त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते. विषय बाधक नाही, पण विषयासक्ती बाधक आहे. भगवंताला प्रसन्न करुन घेऊन नाशिवंत वस्तू मागितली तर काय उपयोग? नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली, तशी आपण ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले. आपण ते विषयासाठी घेऊ नये.
जगातले सर्व लोक सुखासाठी प्रयत्न करीत आहेत. शास्त्रांचे पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली, त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढले; पण मानव सुखी झाला नाही. आजारी माणसाचा ताप जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही. त्याचप्रमाणे मानव सुखी झाला नाही, तोपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असे समजावे. सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काल राहिलेला नाही. प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे. यासाठी भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये; मग धोका नाही. सगळ्यांनी असा निश्चय करा की, भगवंताच्या नामापरत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. जे मिळेल त्यात समाधान मानायला शिका. ‘ मी भगवंताचा आहे ’ असे म्हटल्यावर सर्व जगत आपल्याला भगवत्स्वरुप दिसू लागेल यात शंका नाही. ही केवळ कल्पना नाही, आपण अनुभव घेऊन पाहात नाही. त्यासाठी नामस्मरणात आपण राहू या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel